सोमवार, २९ मे, २०१७

अतिअतिअतिनाटकिय सरकार - ३

पुण्याई ही एक अशी जादूची गोष्ट आहे. कि जिचा वापर करून आपण एकच गोष्ट अथवा अनेक विचित्र गोष्टी पुन्हा पुन्हा करू शकतो. त्यात यशस्वी हो वा न हो त्याने पुण्याई मधे काही फरक पडत नाही. ती तशीच राहते. 
 अशाच काही पुण्याईवर राम गोपाल वर्मा नामक व्यक्ती अजून ही चित्रपट काढत आहे. शिवा, सत्या, रंगीला, भूत, कंपनी आणि सरकार अशा चित्रपटांच्या पुण्याईवर रागोव ने बरेच चित्रविचित्र प्रयोग केले आहे. त्यातला सरकार या चित्रपटाची पुण्याई घेऊन सरकार - राज काढला परंतू बोन्साय झाडाला कितीही पाणी दिले तरी ते मोठे होत नाही. सरकार-राज आपटला. पण रागोव ची हौस काही फिटली नाही. ९ वर्षानी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माथी सरकार मारलेला आहे. जो सरकार राज पेक्षा अतिनाटकिय आणि वैतागाची वाडी आहे.

कथानक अगदी ३ ओळींचे आहे.

ओळ पहिली :- मुंबई शहरात महाराष्ट्र सरकारचे हुकूम चालत नाही तिथे सुभाष नागरे नामक 'सद्गगृहस्थाची" मर्जी चालते. त्याच्या हातात सरकारचे रिमोट आहे.
.
ओळ दुसरी :- सुभाष नागरे यांना जे योग्य वाटते तेच ते करतात. आणि जे योग्य वाटत नाही ते स्वतःही करत नाही दुसर्‍याला ही करू देत नाही.
.
ओळ तिसरी:- कुठलाही प्रोजेक्ट आला की त्याला नागरे विरोध करणार आणि प्रोजेक्ट घेऊन येणार्‍या व्यक्तीबरोबर संघर्ष करणार.

---झाली. इतकेच कथानक या चित्रपटाचे आहे. असे सरकार - राज चित्रपटाचे सुध्दा कथानक असेच होते. असो.

कथेत नाविन्य काही नाही. कथेला आगापिछा नामक प्रकार नाही. सरकार आणि सरकार राज हे एकमेकांशी संबंधित होते असे दाखवले. पण सरकार -३ मधे असे काही नाही. सुभाष नागरे , त्याची बायको, आंणि त्याचा नातू जो मागिल दोन चित्रपटांमधे आजोळी असतो. हे तिन व्यक्तिरेखा संबंधापुरत्या आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला सुभाष नागरे दोन्ही मुलांच्या मृत्युनंतर एकटा संघर्ष करत आहे (कुणाशी? ते विचारू नये) त्याला टिव्हीवर बघून मोठा झालेला नातू चिकू उर्फ शिवाजी याला सरकार सोबत काम करायचे आहे. आणि तो अचानक आजोळीमधून मुंबईत येतो. पटकन सरकारच्या घरात येतो. झटकन सरकारला त्याच्यावर विश्वास बसतो. एकदम सुपरफास्ट कथानक. हे इतके जलदगतीने होते की सरकारचा उजवा हात (डावा का नाही) असणारा गोकूळ (रोनित रॉय) गोंधळतो. अशामधे मुंबई मधे धारावीचा विकास करण्यासाठी बिल्डरलॉबी प्रयत्न करते. पण विकासाचे आणि नागरेचे आधीच्या चित्रपटापासून वाकडे असल्याने (आठवा सरकार - राज मधे वीजकंपनी घेऊन ऐश्वर्या येते इ.) नागरे त्याला विरोध करतो. मग ते लोक चिकूला स्वतःकडे वळते करतात. अहो भाग्य चिकूला मुंबईत आल्याबरोबर गर्ल्फ्रेंड सुध्दा मिळते आणि ते ही योगायोगाने नागरेने मारलेल्या बिल्डरची मुलगी असते. (चित्रपटाची जेव्हा जाहीरात केली होती तेव्हा यामी गौतमीला रिक्षा चालवणारी दाखवलेली, पण ऐनवेळेस यामीला रिक्षा चालवता आली नसेल म्हणून तिला बिल्डरची मुलगी बनवली असे वाटत आहे. ) सगळे मिळून नागरे विरुध्द कटकारस्थान चालवतात. त्यांना राजकिय साथ नागरेला सुरुवातीपासून विरोध करणार्‍या गोविंद देशपांडे (मनोज वाजपेयी) नामक स्थानिक नेत्याची मिळते. (मनोज नसला तरी चालला असता. असे ही त्याला वायाच घालवले आहे) आणि यासगळ्यांच्या मागे सुत्रधार मायकल (जॅकिश्रॉफ) आहे. जो दुबईत नेहमी एकाच तरुणीसोबत स्विमिंगपुल मधे पोहत असतो. (दुबई मधे इतकी उष्णता आहे की लोक पाण्याबाहेर येत नाही असे काहीवेळ वाटू लागले होते)शेवटी ट्विस्ट, महाट्विस्ट (जे आपल्याला आधीच अंदाज येतो) घेऊन कथानकाप्रमाणे नागरे सगळ्यांना पुरून उरतो.
चित्रपटात अमिताभ अतिशय थकलेले वाटतात, एकदम काटकुळे खप्पड बसलेले, त्यात आत गेलेल्या गळ्यामधे ३-४वेळा फिरवलेली रुद्राक्षाची माळ जी मानेपेक्षा मोठी वाटते, एकदम कुपोषणग्रस्त अमिताभ वाटतात. जे अजिबात बघवत नाही. संवादफेक सुध्दा जमली नाही. बर्‍याच ठिकाणी लिप मुव्हमेंट मराठी भाषेची वाटते आणि ऐकायला हिंदी येते. " मुझे जो ठिक लगता है वो मै करता हु" हा संवाद चित्रपटात इतक्या वेळा अमिताभ आणि इतरजण बोलतात की याव्यक्तिरिक्त संवाद सुचले नाही असे वाटले. संवाद लिहिणार्‍याने सुध्दा "इतने पैसे मे इतनाईच मिलेगा" टाईप संवाद लिहिले आहे. कथेत नाही किमान संवादामधे तरी नाविण्य आणा राव. .!!
शिवाजी उर्फ चिकू झालेला अमित सुध.ने तर शुध हरवल्यासारखी अ‍ॅक्टींग केली आहे. "सुलतान" मधे जितका तो प्रोमेसिंग वाटत होता त्याहून कित्येक पटीने वाया गेलेला वाटला. संवाद किंचाळून बोलले पाहिजे ही बहुदा अट होती. त्याला तो मनापासून जागला बिचारा. इतकी ओव्हर अ‍ॅक्टींग तर कांती शहाच्या चित्रपटात सुध्दा कोणी केली नसेल. 
यामी गौतमी सुंदर दिसली . इतकेच तिचे चित्रपटात महत्त्व आहे. बाकी हिरो बरोबर फिरणे इतकेच काम आहे,.
रोनित रॉय ने त्याची भुमिका मन लावून केली आहे. स्वतःच्या सेकंड इनिंग मधे छोटे मोठे रोल मधे सुध्दा तो एक छाप पाडून जातो.

सर्वात महत्त्वाची भुमिका अभिषेक बच्चनची आहे. अभिषेकचा फोटो हॉल मधे लावलेला असतो. दरदिवशी नागरे त्या फोटोच्या जवळ ठेवलेल्या "बोन्साय" झाडाला पाणी देतात, त्याची काळजी घेतात. अभिषेक बच्चन एक बोन्साय आहे. ज्याची काळजी अमिताभ बच्चन सारखी घेतात त्याला वाढवण्यासाठी सतत पाणी शिंपडणे चालू असते. परंतू हे विसरतात की "बोन्साय झाडाला" कितीही पाणी द्या खत द्या. ते वाढत नाही त्याची वाढ मर्यादीत आहे. असा काहीसा छुपा संदेश रामगोपाल वर्माला अमिताभ ला तर द्यायचा नसेल असे सारखे वाटत होते. ;)
संवाद :- To be, or not to be, या जगप्रसिध्द वाक्याचे सर्वोत्तम उदाहरण या चित्रपटातले संवाद आहे. संवाद मराठी मधे हवे की हिंदी मधे हवे हे दिग्दर्शकाने संवादलेखकाला स्पष्टपणे सांगितले नाही. मराठी वाक्यानंतर त्याच अर्थाचे हिंदी वाक्य म्हणून टाकले गेले आहे. फक्त मराठी बोलले असते तरी चालले असते (चेन्नई एक्स्प्रेसमधे तामिळ बोलल्यावर परत तेच हिंदीमधे रिपिट केले नव्हते.. प्रेक्षक समजून घेतात) बर्‍याचदा पडद्यावर मराठी बोलली जात होती आणि ऐकायला हिंदी येत होते. म्हणजे संवादलेखकाने डंबिंग करताना देखील घोळ घातलेला आहे. सुरुवातीचे दोन शब्द मराठी पुन्हा तेच हिंदीमधे रिपीट पुन्हा मराठी पुन्हा पुढचे हिंदी असला धेडगुजरी अवतार या चित्रपटाद्वारे कानाला ऐकायला मिळाला.
विचित्र कॅमेरावर्क साठी याचित्रपटाचे गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड मधे नाव द्यायला हवे. राम्याने आधीही आचरटपणा केला आहे. पण यात तो अक्षरशः वाहत गेला आहे. नागरे च्या घरातल्या मुर्त्या शोपीस यांच्यावर असा काही फोकस - डिफोकस केला आहे की एकीकडे संवाद चालू असतात तर आपण पडद्यावर कुत्र्याचा पुतळा क्लोजप मधे बघत असतो. का? कशासाठी? काय संदेश द्यायचा आहे? हे चित्रपट संपल्यानंतर सुध्दा प्रेक्षकांना उमगत नाही. तोच प्रकार नागरेच्या घरातला मोठ्ठा गणपती सदृश्य हत्तीच्या स्टॅच्यु बरोबर केला आहे. घरात कोणता पाहूणा आला आहे त्याच्याशी यजमान संवाद साधत आहे पण दिग्दर्शकाला मात्र हत्तीचा चेहरा दाखवण्यात इंटरेस्ट आहे. तेही विविध अँगलने कधी वरून , कधी बाजूने कधी लांबून मनात आले की याला जोरात विचारावे " अरे भाई आखिर तुम दिखाना क्या चाहते हो" कॅमेराचा अँगल अतिशय भयंकर कंटाळवाणा संबंध चित्रपटात आहे.
गोविंदा गोविंदा गाणेस्वरूपाचे बॅक्ग्राउंड संगीत पहिल्या चित्रपटात एकदम दणदणीत इफेक्टीव्ह वाटलेले. परंतू या चित्रपटात या संगीताचा डेसिबल मोजायला दिग्दर्शक विसरला. इतका कानठाळ्या बसणारा कर्कश आवाज चित्रपटगृहात घुमतो की लोक कानावर हात ठेवतात. संवाद कमी बॅकग्राउंड संगीत जास्त असे झाले आहे. एडीटींग करताना दिग्दर्शकाने कानाला हेडफोन लावून चित्रपट बघितला नसेल. अथवा तो हळू हळू बहिरा होत असेल.
याचित्रपटाने काही बेसिक प्रश्न पडले.
१) सरकार राज मधे ऐश्वर्या नागरेच्या जागी बसून सगळी सुत्रे हलवते. असा काहीसा प्रसंग शेवटी होता. त्यात चिकू को बुलाओ असे नागरे म्हणतात. आता सरकार-३ मधे ऐश्वर्या कुठेच नाही. मग तिचे काय झाले ? ती मेली असेल तर अभिषेक बरोबर तिचाही फोटो हवा होता.
२) आधीच्या चित्रपटात जर नागरे स्वतः चिकू ला बोलवा म्हणतो मग त्याला इतकी वर्षे तिकडे कोकणात आजोळी का बरे ठेवला? त्याच्या आईला वाटत होते की तो मुंबईला येऊ नये. पण नागरेचे बोलवणे होते ते कसे टाळले गेले. ? आणि तो आल्यानंतर देखील नागरे मात्र खुष नव्हते. ?
३) आल्या आल्या घरात स्वतःचा हुकूम चालवायचा प्रयत्न करणे चिकूचे नागरे खपवून कसे घेतात? जुन्या माणसांना चिकू दुखावू शकतो इतकी साधी समज नागरेला नव्हती? 
असे बरेच काही आहे. डोक्याला ताप करून घ्यायचा असल्यास अवश्य जावा.
मला खुप गरम होत होते म्हणून चित्रपटगृहातल्या थंड हवेत जाऊन थोडा वेळ बसलेलो. झोपायला हवे होते असे आता वाटू लागले आहे.

लोगन -

एक्स - मॅन या सुपर हिरोंचे फॅन असणार्‍यांना "लोगन" चित्रपटाची फार उत्सुकता होती. ह्युज जॅकमॅन याचा "वोल्वरीन" या सुपरहिरोवर स्वतंत्र श्रेणीतील ३रा चित्रपट आहे. प्रेक्षकांना अगदी सुरुवाती पासून म्हणजे एक्स मॅन वर आधारीत पहिल्या चित्रपटापासून "वोल्वरिन" या कॅरेक्टरवर प्रेम बसलेले. दर चित्रपटासोबत ते वाढत गेले. हे प्रेम पाहून निर्मात्यांनी त्याच्यावर स्वतंत्र चित्रपट बनवण्याचे ठरवले २००९ साली X-Men Origins: Wolverine या नावाने तो रिलिज झाला. पुर्ण एक्स मॅन श्रेणीतील सर्व सुपरहिरोंमधून फक्त त्याच्यावरच चित्रपट बनला यावरून त्या कॅरेक्टरची लोकप्रियता दिसून येते. काही वर्षांनी The Wolverine हा त्या स्वतंत्र श्रेणीतील २रा भाग म्हणून समोर आला. त्यानंतर आता "लोगन" ३रा आणि शेवटचा भाग म्हणून आला आहे.

वोल्वरिन हे कॅरेक्टरच फार विचित्र होते. जखमा न होणारा, हातातून सुर्‍यासारखी पाती बाहेर येणारा, ऑलमोस्ट अमर असणारा, कुणाच्याही ताब्यात न येणारा, स्वतःच्या मर्जीचा मालक, कुठे ही कुणासमोर ही हार न पत्करणारा अशा विविध विशेषणे या "वोल्वरिन" कॅरेक्टरची होती. दाढी वाढलेला बिन मिशांचा चेहरा, केस दोन्ही बाजूंनी उभे असलेले. गबाळ अवतार, टापटीप नावाचा शब्दच डोक्याच्या डिक्शनरीत नसलेला असा हा "लोगन" "ह्युज जॅकमॅन" ने अक्षरश: जिवंत केलेला. इतका की जसे आपल्याकडे लोक "जय संतोषी माता" नामक चित्रपटातील अभिनेत्रीच्या पाया प्रत्यक्षात पडत होते तसे ह्युज ला बघितल्यावर लोक त्याचे हात बघत होते. कधी जगप्रसिध्द लखलखती धारदार पाती बाहेर येतील याची आशा घेऊन त्याच्या बोटांकडे लक्ष देत. पडद्यावर तो कुणाला भिडला म्हणजे समोरच्याची शामत आली हे डोक्यात फिट्ट बसले. मग त्याच्या समोर कोणी कितीही बलिष्ठ खलनायक का येईना. आपला "लोगन" पुरुन उरतोच. फक्त मॅग्निटो समोर बिचार्‍याचे काही चालत नव्हते. पण X-Men: Days of Future Past मधे लोगन भुतकाळात गेला होता तिथे त्याच्या अंगात लोखंड नव्हते. तेव्हा तरुण मॅग्निटो ला भारी पडलेला. एक सच्चा वॉल्वरिन प्रेमी म्हणून ते बघायला मजा आलेली.
चित्रपटाची सुरुवातीला स्पष्ट होते की लोगन आता उतारवयात आला आहे. वाढत्या वयासोबत त्याचे शरीर अशक्त होऊ लागले आहे.

सरकार सगळ्या म्युटन्ट लोकांना एक तर मारून टाकत आहे नाहीतर त्यांच्यात औषधे देऊन त्यांची शक्ती संपवत आहे. स्पेशल फोर्स अशा लोकांच्या मागे सतत लागली आहे. त्यांच्या लिस्टवर "प्रोफेसर" एक नंबरवर आहे. लोगन त्यांना घेऊन शहरांपासून लांब एका गावात साथीदाराच्या मदतीने लपवून ठेवले आहे. प्रोफेसर आता फार म्हातारे झाले. त्यांना त्याच्या मानसिक शक्ती ताब्यात ठेवता येत नाही. स्वतःच्या वृध्द वडिलांची जशी सेवा केली जाते त्या प्रकारे लोगन आपले कार्य करत आहे. एक दिवस एक बाई त्याच्या जवळ मदत मागायला येते.तिच्या मते स्पेशल फोर्सेस ने म्युटनचे जेनेटेक्स काही मुलांमधे वापरून त्यांना प्रशिक्षित केले आहे. परंतू ती मुलं हाताबाहेर जाऊ लागल्याने त्यांना मारण्याचा प्लॅन करतात. ती बाई त्यातील काही मुलांना सोडवते आणि एका गुप्त ठिकाणी सुरक्षित पाठवते तिच्या जवळ लौरा नामक एक मुलगी असते जीची शक्ती हुबेहूब लोगन सारखी आहे. तिला त्या ठिकाणी पोहचवण्याची जवाबदारी लोगन पैशाच्या मोबदल्यात घेतो. लौराच्या मागे स्पेशल फोर्स लागलेली असते. लौरा आणि स्पेशल फोर्स यांच्यामधे लोगन उभा राहतो. तो त्या मुलीला त्या इच्छित जागी पोहचवतो का? तिच्यात लोगन सारखी शक्ती कशी आली? प्रोफेसर यांना सांभाळून लोगन कसे हे काम करतो.? इ. साठी चित्रपट पहायला हवा.

लोगन याचे कॅरेक्टर या चित्रपटात नेहमी पेक्षा वेगळे आहे. एक थकलेला, खचलेला वयस्कर माणूस जो सतत आश्रयासाठी भटकत असतो. त्याचे आणि प्रोफेसरला लागणार्‍या औषधांसाठी पैसे मिळवणे हा एकमेव उद्देश लोगनचा राहिल आहे. त्याच्या जवळची माणसे मरण पावली आहे. एक प्रोफेसर आहे म्हणून लोगन आहे. प्रतिकार करण्याची इच्छा आहे पण तितकी शक्ती आता अंगात राहिली नाही. जखम लवकर भरत नाही त्यात इन्फेक्शन होत आहे. त्यामुळे स्वभाव फार चिडचिडा झाला आहे. शरीर लवकर थकल्याने अगदी लहान मुल पण काहीवेळेस भारी पडतात. खलनायक म्हणून जे आहे त्यांच्या समोर तर अगदीच नाईलाज होतो. पण प्रतिकार मात्र शेवट पर्यंत सोडत नाही. असा लोगन पडद्यावर बघणे फार त्रासदायक आहे. कोणे एकेकाळी लोगनच्या नुसत्या ओरडण्याने समोरचा थरथर कापत होता. आता मात्र तसे काही घडत नाही. त्याला पडद्यावर मार खाताना बघवत नाही. आपण ऑटोमॅटिक तो मार खात असताना इकडे तिकडे बघू लागतो. ह्युजने वयस्कर माणसाचा अभिनय फार समरसतेने केला आहे. असे वाटते की त्याने स्वतः त्याच्या भविष्यातील ह्युज कसा असेल याचा अचूक अंदाज घेतला आहे.

बाकी चित्रपटात असणारे लोकांवर जास्त फोकस नाही आहे. लौरा साकारणारी Dafne Keen हिचा हा पहिला चित्रपट असुन देखील भुमिका चांगली केली आहे. भविष्यातील एक्स मॅन चित्रपटात वॉल्वरिन आता पुरुषाकडून स्त्रीकडे स्थलांतरीत केले जाईल असे वाटते.

लोगन आणि प्रोफेसर एक्स यांचा प्रवास इथे संपला. आता पुढे कुठल्याही चित्रपटात ह्युज हा वॉल्वरिन म्हणून दिसणार नाही याची चुटपूट कायम राहणार.
LONG LIVE WOLVERINE..!!