बुधवार, ४ मे, २०१६

सैराट - movie review

"सैराट झालं जी ....सैराट झालं जी"

नागनाथ मंजुळे यांच्या पोतडीतून निघालेला दुसरा चित्रपट. 'सैराट' धावत सुटणे, सैरभैर वागणे.
फँड्री मधे जब्याने एक 'दगड' कॅमेराकडे जीव खाऊन भिरकवला होता. 'सैराट' ला त्याच्या पुढची कथा असेच म्हणावे लागेल. माणूस सैरभर झाल्यावर कसाही वागतो. विचार करणे, समजून घेणे हे 'सैराट' झाल्यावर कळत नाही. डोक्यात 'वारा' शिरलं की मागचा पुढचा विचार न करता बेफ्फाम वागतात. या सैराटपणाचे विविध कांगोरे नागनाथ मंजुळे यांनी सुरेख दाखवले आहे.

परशा गावातील कोळ्याचा हुशार मुलगा, खेळात अभ्यासात चांगला असणारा. त्याचे प्रेम म्हणजे आर्ची गावाच्या पाटलाची मुलगी. दोघे कॉलेज मधे गेल्यावर परशा आणि आर्चीचे सुर जुळतात पण भिन्न जातीचे असल्यामुळे घरातून विरोध होतो. परशा आर्ची मित्रांच्या मदतीने गावातून पळून जातात. बर्‍याच घडामोडीं, अडचणींचा सामना करत संसार थाटतात आणि.....

छोटीशी प्रेमकथा नागराजने वास्तवाचे चटके देत दाखवली आहे. फँड्री मधे प्रेमकथा होती पण तीचा बाज वेगळा होता. ही प्रेमकथा आपल्या सामान्य जीवनात घडणारी आहे. तुमची आमची, बाजुला, आसपास राहणार्‍या प्रिया-अतुल्ची, रेश्मा - पिंट्याची, सलीम-झोयाची, अशी आपलीच प्रेमकथा आहे. शाळेत "शिस्तीत" असणारे वय कॉलेज मधे गेल्यावर बंधने तोडू लागते. कॉलेजलाईफ मधे १०० पैकी ९५ जणांचे तरी प्रेम प्रकरण सुरु होते. मग ते एकतर्फी असो दुतर्फी असो या त्रितर्फी असो. चालू मात्र होते. आणि मित्रांची मदत तर फारच. अगदी इतिपासून. ते ही उत्साहात स्वतःतर्फे फ्री सेवा. कधी कधी तर "या दोघांचे चालू आहे" ही गोष्ट "त्या" दोघांना सोडून सगळ्यांना माहीती करून देण्यात या मित्रांचा हात-पाय डोस्कं सगळं असते. चिठ्ठी देण्यापासून ते मोबाईल वाजण्यापर्यंत सगळ्या घटना आपापल्या आयुष्यात घडून गेलेल्या असतात. चिठ्ठी देण्यासाठी मैत्रिणी, बहीनी पासून ते गल्लीतल्या बारक्याला पटवण्याच्या तर्‍हा या ओळखीच्या वाटतात. संवाद प्रसंग अगदी वास्तवातले असल्यामुळे कथेत आपण कधी गुंतून जातो आणि आर्चीच्या जागी लीना/प्रिती/कुसुम दिसायला लागतात हे कळतच नाही. ही ताकद नागराजने आपल्या दिग्दर्शनातून दाखवून दिली. अगदी बारीक सारीक प्रसंग सुध्दा जिवंत केले आहे. मुलीने कागद गॅलरीतून खाली फेकल्यावर परशाचा मित्र ज्या पध्दतीने तो कागद उचलतो त्याला खरच सॅल्युट. तो प्रसंग तुफ्फान आहे. कागदात काय आहे हे बघितल्यावर तर हसुन हसुन पुरेवाट लागते. तसेच आर्चीचा पहिल्यांदा जेव्हा फोन येतो तेव्हा फोन आल्याच्या आनंदात नाचतच राहतात. फोन उचलायचा राहून जातो.  रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना ट्रेन पास होत असते आता या वेळेत काय करायचे तर त्या ट्रेनच्या आवाजात ठेका धरून नाचायचे उगाचच. असे छोटे छोटे प्रसंग टिपिकल सिनेमातील नसुन सामान्य रोजच्या घडामोडीतले आहे. म्हणून पडद्यावर  नेहमीपेक्षा नविन काहीतरी दिसते.
परशा-आर्चीच्या भांडणाचे कारण तर कित्येक लोकांनी प्रत्यक्षात अनुभवले असेल. "पासवर्ड काय आहे" फोन कुणाचा" इ. खटके उडण्याची कारणे सुध्दा लहानच पण आपल्यापैकी आहे.  हे सर्व आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणार्‍या गोष्टी आहे. जे पडद्यावर पाहताना प्रेक्षक रिलेटेड होतात. कुठे लांबलचक पल्लेदार  संवाद नाही, हिरोसारखी १० जणांना एकसाथ लोळवणारी मारामारी नाही . सगळं "जिवंत" आहे.


या चित्रपटात आर्ची हिरो आहे आणि परशा हिरोईन आहे असे कुणाला वाटल्यास नवल नाही. हिरोईनला खमकी दाखवणार्‍या चित्रपटात एक तर तीला इन्स्पेक्टर टाईप भुमिका असते या बड्याबापाची मुलगी त्यात पण हिरोची एंट्री झाली की मग तो चित्रपटात वरचढ होतो. पण सैराट या बाबतीत वेगळा ठरतो. तोर्यात प्रत्येक गोष्टीवर माझाच होल्ड हवा अशी  वागणारी मुलगी  ते एक जवाबदार ,  परिस्थितीला जुळवून घेणारी तरी सत्ता हातात राखणारी बायको  असे बदल यशस्वी दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.  " बाळ नवर्‍याच्या हातात देऊन त्याला मागे बसवून स्वतः गाडी चालवणारी पडद्या वरची पहिली बायको" आर्ची ठरली आहे. यातून आर्चीचा दबदबा दिसून येतो. तिच्या व्यक्तीमत्वात 'ही ऐकुन घेणारी नाही तर चांगलेच ऐकवणारी आहे' हे स्पष्ट दिसते.  ती स्पष्ट आहे सशक्त आहे मुळात तिला जे करायचे आहे ते ती करणारी आहे.
आर्चीच्या भुमिकेत रिंकू राजगुरु ने कमाल केली आहे. तिच्या ऐवजी दुसरी कोणी आर्ची असुच शकत नाही. इतकी परफेक्ट त्याभुमिकेत बसली आहे. तिचे मोठे डोळे कमालीचे बोलके आहे.  अगदी सहजतेने अभिनय केला आहे. कॉलेज मधली अल्लड मुलगी ते संसार सांभाळणारी बायको हे अगदी सहजतेने तिला जमले आहे. मोठ्या घरातून लहान घरात आल्यावर तिच्यात आलेले  छोटे छोटे बदल उठून दिसतात. संयत आणि नैसर्गिक अभिनय नवोदितांनी केला आहे.

परशाची भुमिका करणारा आकाश ठोसर अतिशय शांत समंजस दाखवला आहे. लाजरा असल्याने आर्ची चे बिंधास्तपणा त्याला लवकर झेपत नाही. गडबडून जातो. पण नंतर आर्चीला समजून घेतल्यावर तिच्या उणिवा तो भरून काढतो. परशामधे जास्त बदल झालेले दाखवले नाही. मुळात तो समजून घेणारा असल्याने एक दोन प्रसंगात त्याचा कंट्रोल सुटल्याचे दाखवले पण ते तेवढेच  बाकी मिळेल ते काम करुन आर्चीची जवाबदारी घेण्याचा प्रयत्न त्याचा दिसून आला. आकाश नवोदित आहे हे कुठे ही वाटत नाही. त्याची संवाद शैली टायमिंग अचूक आहे.

इतर कलाकारांमधे परशाची मित्र झालेले सलिम आणि लंगडा म्हणून काम करणार्‍या मुलांनी धमाल केली आहे. सत्यामधे जर भिकु म्हात्रेने भाव खाल्ला असेल तर सैराट मधे सलिम आणि प्रदिप यांनी हा वाटा उचलला आहे.
यंदाचे सहनायक म्हणून यांना पारितोषिक मिळायला हवे. जीवाला जीव देणारे मित्र शोभून दिसतात.
पण आर्चीचे वडील आणि भाउ यांचा इतकासा प्रभाव पडत नाही. चेहर्‍यावर भाव विरहीन संपुर्ण चित्रपटात दिसले आहे. अगदी मास्टरपीस असणार्‍या शेवटच्या दृष्यात सुध्दा मख्खपणा दिसून येतो. हे थोडेफार खटकते.

अजय अतूल यांचे संगीत म्हणजे एक वेगळी मेजवाणी असते हे आता पर्यंतच्या त्याच्या सर्व चित्रपटातून सिध्द झाले आहे. "याडं लागले" या गाण्यात symphony स्टुडीओ मधे अरेंज केले होते. त्यात सगळ्या प्रकारचे violin बासरी एकसुरात ऐकल्यावर भव्य वाटते. अजयचा आवाज हा या गाण्यात एक तीक्ष्ण तलवारीसारखा ठरतो. गाण्यातली जी भाषा आहे त्यात त्याचा आवाज अचूक बसतो. अशा ग्रामिण शब्दांना न्याय त्याच्या वेगळ्या आवाजात मि़ळतो त्याच्या जागी सोनू निगम स्वप्निल बांदोडेकर् यांचा आवाज सुट होणार नाही. शहरी बाज असता तर अजयचा आवाज नक्कीच मिसमॅच झाला असता पण सुदैवाने तसे झाले नाही
"झिंगाट" तर टिपिकल अजय अतूल स्टाईल आहे एकदम बुग्गांट चाल आणि ढिंग्चॅक ठेका. गणपती, लग्नाची वरात यांच्यामधे हे गाणे सुस्साट चालणार आहे. वेगवान चाल आणि त्याला साजेशे शब्द याने गाणे  एखाद्या रॅप म्युझिक सारखे झाले आहे.
सैराट झालं जी हे गाणे वेगळे वाटते . चिन्मयी श्रीपद हीच्या संथ हळुवार आवाजाच्या मुखड्यानंतर येणारा अजयच्या रांगड्या आवाजात "सैराट झालं जी" हे मुखडा कम्प्लिट करणारे शब्द एक वेगळा परिणाम साधून देतात.
याडं लागलं, सैराट झालं  आणि झिंगाट या तिन्ही गाण्यामधे अजय अतूल यांनी ढोल ताशे यांचा मुक्त वापर केला आहे. याडं लागले आणि सैराट झालं या दोन गाण्यात ठेका देतानाचा  पुणेरी ढोलवरचा दणदणीत दणका उठून दिसतो. तर "झिंगाट" मधे नाशिक ढोल याचा वापर वाटतो.
ही तीन गाणी एकीकडे तर "आताच बया का बावरलं" हे श्रेया घोषलने गायलेले गाणे एकीकडे आहे. यात बॉलिवूड मसाला संगीत दिले आहे. सॅक्सोफोन, ड्रमसेट्स, इलेक्ट्रोनिक गिटार यांचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. त्यात श्रेयाचा गोड आवाज तर कुंदणात हिरा बसवल्यासारखा आहे.

चित्रपटात कॅमेरावर्क अतिशय सुंदर आहे.  फ्रेश लोकेशन,  लखलखीत उन्हात घेतलेला विहिरीचा शॉट,  पक्षांच्या थव्याबरोबर कॅमेरा फिरणारा शॉट,  सुर्यास्ताच्या वेळेस परशा-आर्ची कठड्यावर बसलेले असताना पाठीमागून सुर्याचे रंग मिसळलेल्या पाण्यावरून रोलिंग होत जाणारा शॉट थक्क करणारे आहे. यामुळे सुंदर सिनेमा अजुन सुंदर बनतो.

दिग्दर्शनाबद्दल एकच ओळ " शेवटी लहान मुलाचे पाऊल ज्या तर्‍हेने जमिनीवर उमटते. ते पाऊल सिनेमा हॉल मधल्या प्रत्येक काळजात खोल खोल रुतले जाते. "

मुलं वयात आल्यावर प्रेमात पडतात पळून जाण्याचे स्वप्न बघतात पण प्रत्यक्षात काय कठिण परिस्थिती येते याची जाणिव त्यांना याचित्रपटातून मिळेल. नुसते चित्रपटात दाखवल्यासारखे सगळे सुरळीत होत नाही. त्यांच्यामागे घरच्यांची काय परिस्थिती होते त्यांच्यावर काय आभाळ कोसळते याची देखील दखल मुलांनी घेतली पाहिजे. त्यांचा आनंद हा पालकांचा सुध्दा आनंद असतो हे मुलांनी मनात रुजवायला पाहिजे समजले पाहिजे. तुम्ही त्यांची मुल आहात त्यामुळे तुमच्या स्वातंत्र्याबरोबर तुम्हाला कर्तव्य सुध्दा मिळले आहे. प्रेम करा घरी नीट समजावून सांगा सगळ्यांचे पालक शांततेने ऐकणार नाही पण आपला मुलगा/ मुलगी आपल्याला काही त्याच्या आयुष्यातले महत्त्वाचे सांगत आहे याचा आनंद/ मानसिक स्वास्थ त्यांना निश्चित लाभेल. त्यावेळेस ते ऐकणार नाही पण नंतर ते जेव्हा विचार करतील तेव्हा नक्कीच तुमच्या बाजूने सुध्दा करतील. सामंज्यसातून मार्ग निघतो निघू शकतो यावर विश्वास मुलांचा बसायला पाहिजे. आणि तो त्यांचा बसेल ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे.  तुमचा मुलगा/मुलगी पळून गेले अथवा तुमचे न ऐकता लग्न केले याचा अर्थ तुम्ही चुक आहे तुमची मुल चुक आहे असा होत नाही. कदाचित तुमच्यावर त्यांचा विश्वास बसावा असे वाटले नसेल. आमची मनस्थिती आमचे पालक नक्की समजून घेतील असा विश्वास १०० पैकी १० पेक्षा कमी मुलामुलिंना असेल ही परिस्थिती आजच्या काळात आहे. आजच्या जीवघेण्या स्पर्धेत पालक आपल्या मुलांना एका गुलामाप्रमाणे वागवत असतात. इतकेच मार्क हवे, सर्व खेळांमधे अव्वल हवा. हे जे अपेक्षा पालक आधीपासून मुलांवर थोपवतात त्यातून त्यांची छोटीशी मनाविरुध्द केलेली गोष्ट यावर पालक बर्‍याचदा चुकिच्या पध्दतीने रिअ‍ॅक्ट करतात. त्यामुळे मुलांच्या मनात "ही लोक आपल्याला समजून घेत नाही" ही एक भावना निर्माण होते. जी हळू हळु वाढत जाते. कॉलेजलाईफ मधे मग मुल हटकून पालकांच्या मनाविरुध्द करतात या करू पाहतात.


लोकांच्या मनातून जो पर्यंत "जात" जात नाही तो पर्यंत कित्येक सैराट घडले आहे घडत आहे आणि घडत राहतील. संपुर्ण चित्रपटात "जात"चा उल्लेख नाही आहे पण "जात" ही दिसत नाही तर जाणवते. हेच या जातीचे वैशिष्ट्य म्हणा या अवगुण म्हणा हा एक अभिशाप भारतीय समाजाला प्राचीन काळापासून मिळाला आहे. खोटी प्रतिष्ठा, खोट्या समजूती साठी माणस पार लयास जातात. जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिच्यासाठी इतके करणार्‍या व्यक्ती या  अस्तित्वात असणार्‍या माणसांसाठी मात्र ५ पैशाचे काही करत नाही.  इर्षा, अहंकार या दोन अवगुणापेक्षा "माझी जात" हे सर्वात भयानक अवगूण आहे.  मी अमुक जातीचा आहे. असे कोण म्हणाला तर त्याला "म्हणजे काय" असे विचारले तर उत्तर देता येणार नाही. कारण त्याचा अर्थच त्याला माहीत नसतो पण अहंकार मात्र जोरदार असतो.
मी गोरा आहे म्हणजे काय तर माझ्याकडे बघा  रंग बघा तुम्हाला कळेल असे उत्तर देता येते  पण मी अमुक जातीचा आहे त्याला म्हणजे काय विचारले तर चिडीचूप . सांगणार काय ? दाखवणार काय?  मग कशाचा अभिमान कशाचा अहंकार लोक करतात हे कळत नाही.. उच्च जात खालची जात हे चुकच आहे.  मुळात उच्च निच हा भेदच चुकिचा आहे. तु कोण ठरवणारा माझी जात खालची आहे अथवा उच्च आहे?  कुणाला ही अधिकार हा प्राचिन काळापासून दिला नाही आहे आणि पुढे ही मिळणार नाही.
आपल्याच जातीतला मुलगा आपल्या मुलीला हुंड्यासाठी त्रास देणार नाही जाळून टाकणार नाही, घराबाहेर हकलून देणार नाही हे स्टॅम्प पेपर वर लिहून देणार का कोण ? आहे कुणाची हिम्मत?  अरे मग कशाला त्या जातीचाच मुलगा मुलगी हवी. जात बघण्यापेक्षा मुलीमुलाचे गुण बघा. तुमच्या हृदयाच्या तुकड्याला नीट सांभाळेल का ते बघा. तर तुमच्या मुलामुलींचे भविष्य सुरक्षित होईल आणि तुमचीही काळजी मिटेल.
हा फुकाचा अभिमान "चुलीत" घाला आणि जातिविरहीत समाजाची मागणी करा.


सैराट झालं जी ऽऽऽऽऽऽ